Friday, November 18, 2011

कामातुराणाम न भयं...

"कामातुराणाम्  न भयं न लज्जा" या अर्थाचा एक श्लोक इयत्ता आठवीत संस्कृत शिकत असताना वाचला होता. माझ्या निरागस बालमनाने तेव्हा "कामातुराणाम् " याचा अर्थ "अति काबाडकष्ट" करणारा असा लावल्याचे स्मरते.
अर्थात, लवकरच माझ्या जाणकार मित्रांनी त्याचा खरा अर्थ समजावून सांगितला.

हे सर्व आता आठवायचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ऒफ़िसमध्ये "Is Workaholism गूड कि ब्याड?" या चावून चावून चोथा झालेल्या विषयावर चर्चा झाली.

पहिली गोष्ट म्ह्णजे, अश्या चर्चा सुरूवात करणारे स्वत:  कधीच Workaholic  असत नाहीत. काम ( = Work!) करण्यापेक्षा ते टाळायचे कसे, यावरच आपली मेंदूशक्ती ( अर्थात ब्रेनपावर) खर्च करणारे हे महाभाग असतात.

दुसरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे, ती म्हणजे मी स्वत: एक workaholic आहे. २००५ ते २००८ अशी चार वर्षे, मी आणि माझे सहचारी नियमीतपणे दिवसाचे ११-१२ तास काम करत असू. अनेकदा तर आम्ही २-३ वाजता -- रात्रीचे -- घरी आलेलो आहे. रविवार कपडे वगैरे (स्वत: चे!) धुण्यात जायचा, पण शनीवारी काय करायचं ते कळायचं नाही, म्हणून ऒफ़ीस गाठायचो. एकदा तर पहाटे ४ वाजता घराच्या कुंपणावरून ऊडी मारून आत येत असता घरमालकीण आज्जींनी पाहिले, व "चोर" "चोर" म्हणून आरडा-ओरडा केला. त्यांना समजावता-समजावता नाकी नऊ आले.

तर, चर्चा चालू होती आणि प्रतिपक्ष तावातावाने बोलत होता की workaholism चा कंपनीला भरपूर फायदा होतो, पण त्या माणसाला काय फायदा?

ऊत्‍तर काय द्यायचे या विवंचनेत असता, वर निर्देश केलेला श्लोक आठवला.

मग काय, मी सर्वांना तो श्लोक आणि माझे original interpretation  सांगून चूप केले: भरपूर काम करणार्या माणसाला ना कशाची भीती असते, ना त्याला कधी कुणाकडून लज्जित व्हावे लागते. संस्कृतमध्ये तसा श्लोकच आहे राव!

हाय काय अन् ‍ नाय काय!

1 comment:

Pranav said...

Lai Bhari.....more innovative interpretations of Sanskrit Shloka's are welcome ;)