Tuesday, November 15, 2011

पाठशाळा, शंकराचार्य आणि षट्पदी स्तोत्र

गेल्या आठवड्यात जळगांव येथील सौ. मीना पांडे यांनी श्रीमद्‍भागवताची प्रत भेट म्हणून दिली. पुस्तकाच्या पहिल्या पानावरचे षट्पदी स्तोत्र पाहिले, आणि मन एकदम भूतकाळात गेले.

ल्हानपणी (म्हंजे यत्ता चौथी ते Standard 9th Division A पर्यंत ) दरवर्षी मे महिन्यात आमची रवानगी वेद-पाठशाळेत व्हायची. सहा वर्षात/महिन्यांत अस्मादिक संध्येपासून ते शांतीपाठ-पवमान पंचसुक्तापर्यंत शिकून राय्ले.

तेव्हा तो जुलूम वाटायचा. पण आता वाटतं कि ते दिन बहोत्त छान थे.

दिवस सकाळी पाच वाजता सुरू व्हायचा. सुर्यनमस्कारांनंतर दिवसभर संथा घेतल्यावर संध्याकाळी खेळ, मग सायंसंध्या आणि मग स्तोत्रे.

पाठशाळा म्हणजे एक भले मोठे कौलारू घर होते. शेणाने सारवलेली जमीन. समोर एक टुमदार देऊळ, आत शंकराचार्यांची सुंदर मुर्ती. मंदिरासमोर एक भलामोठा पिंपळवृक्ष. पिंपळासभोवती विस्तीर्ण पार.
या पारावर आम्ही सारे बटू गोलाकार बसू, आणि टेंगसे गुरुजी किंवा गणपुले गुरुजी आपल्या घनगंभीर आवाजात स्तोत्रे शिकवत फ़िरत असत. रात्रीच्या नीरव शांततेत शंभर-सव्वाशे मुलांच्या आवाजात रामरक्षा अथवा शिवमहिम्न स्तोत्र ऐकण्याचा अनुभव काही आगळाच होता.

शंकराचार्य़ांशी माझी ओळख इथेच झाली.

षट्पदी स्तोत्र, आत्मषट्क, कृष्णाष्टक...अनेक रसाळमधूर रचना शंकराचार्यांनी केल्या. भाषा अतिशय प्रासादिक, अलंकारिक. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ओळीत अनुपम गेयता. त्या वाचताना, म्हणताना, ऐकताना अवर्णनीय आनंद मिळतो.

षट्पदी स्तोत्र दिसले आणि हे सर्व आठवले. वाटलं, हे सर्व आपण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे.

षट्पदी स्तोत्र इथे उपलब्ध आहे. अजून अनेक रचना ऊपलब्ध करून द्यायचा विचार आहे.

1 comment:

Mahesh S Deshpande said...

Good One