Tuesday, April 29, 2008

ययाति

ययाति- वि स खांडेकर
वि. . खांडेकरांच्या "ययाति" ने मराठीला पहिला "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळवून दिला आहे, एवढे सांगितलेतरी या साहित्यकृतीचे महत्त्व ध्यानी येते.

"ययाति" महाभारतातील एका उपकथानकावर आधारीत आहे. नहुषपुत्र राजा ययाति, दैत्यगुरु शुक्राचार्यांचीकन्या देवयानी, दैत्यराज वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा देवगुरू बृहस्पतीपुत्र कच, ही या कादंबरीतीलप्रमुख पात्रें. पैकी ययाति -देवयानी - शर्मिष्ठा यांच्या आत्मनिवेदनातून कथा उलगडत जाते. मानवीजीवनाची सफलता इतिकर्तव्यता यावर या कादंबरीत सखोल चिंतन करण्यात आले आहे. मुख्य कथानकलहान असले तरी मानवे मनोविकारांचे दर्शन, भावनिक गुंतवणुक या द्वारे कथेचे रूपांतर एका नाट्यमयसंघर्षात करण्यात वि. . खांडेकर यशस्वी झाले आहेत.

वासनातिरेकाने माणूस किती रसातळाला जाऊ शकतो याचे विदारक चित्रण आपल्याला कादंबरीत दिसते - राजा ययातिच्या रूपात. या उलट, माणूस आपल्या आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर किती उन्नती करू शकतो, ते कच दाखवून देतो. तो ययाति- देवयानी- शर्मिष्ठा या त्रयील जीवनाचे रहस्य वेळोवेळी विशद करून सांगतो.

"ययाति"च्या कथाभागाइतकेच तिच्या "पार्श्वभूमी" लेखकाने मांडलेले विचारही तेवढेच मनन करण्याजोगेआहेत. कथावस्तू पौराणिक असली तरी तिचा आशय कालातित कसा आहे, हे आपल्याला तिथे उमजूनयेते.अर्थगर्भ, उच्च विचारांनी परीपूर्ण असे साहित्य वाचण्याची आवड असलेया प्रत्येकाने "ययाति" वाचलीच पाहिजे!
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी
पृष्ठें: ४२५

२५ नोव्हेंबर २०००

Monday, April 28, 2008

मृत्युंजय

कर्ण - महाभारतातील एक अलौकिक व्यक्तीमत्व. महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.वस्तुत: सूर्यपूत्र असलेल्या, पण आयुष्यभर सूतपूत्र म्हणून अवहेलना सहन करीत जगलेल्या कर्णाच्या जीवनावर ही कादंबरी आहे.

कादंबरीची शैली निवेदनात्मक आहे. कर्णमाता कुंती, कर्णबंधू शोण, कर्णपत्नी वृषाली, कर्णसखा दूर्योधन, श्रीकृष्ण स्वत: कर्ण यांच्या निवेदनातून कर्णाचा जीवनपट त्या बरोबरच महाभारतकथा उलगडत जाते.प्रासादिक, अलंकारांनी परीपूर्ण अशी भाषा विलक्षण संवाद हा या कादंबरीच आत्मा आहे. लिहून ठेवावीत अशी चिंतनगर्भ वाक्ये पाना-पानावर आहेत. ती लिहून काढली तर तो एक अमूल्य असा साहित्यिक ठेवा बनेल.
कर्णाची चरीत-कहाणी सांगत असताना त्याच्या अवती-भवती असणाया व्यक्तिरेख रंगविण्यातही शिवाजीसावंत सफल झाले आहेत. त्यामुळे हा ग्रंथराज कुठेच एकसुरी झाल्यासारखे वाटत नाही. महाभारतकालीनभाषा, वेशभूषा, चालीरीती, समाजव्यवस्था, आदी गोष्टींबद्दल लेखकाने घेतलेले परीश्रम सहज कळून येतात.

आज "मृत्युंजय" हा मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानला जातो. ही कादंबरी वाचलेल्या कोणत्याही मराठी वाचकाचे वाचन हे अपूर्णच मानावे लागेल.कर्णावर "मृत्युंजय" पूर्वी नंतर बरेच लिखाण झाले आहे; पण ज्याप्रमाणे माधवराव पेशवे म्हटले की "स्वामी" आठवते, त्याचप्रमाणे कर्ण म्हटले की डोळ्यापूढे फक्त एकच नाव येते - मृत्युंजय!

१४ नोव्हेंबर २०००

Friday, April 25, 2008

मोठी आजी

मोठी आजी म्हणजे माझी सख्खी आजी. शिरोड्याला रहाणारी. आम्ही आता २५-२५ वर्षांचे घोडे झालो तरीअजूनही चतुर्थी-दिवाळीला फ़टाक्यांसाठी पैसे पाठवणारी. फ़ोनवर बोलताना रुक्ष "हॆलो" ऐवजी " ऊषा" "गौतम" अशी अकृत्रिम हाक मारणारी. तिच्या नातवांना चष्मे लागले तरी स्वत: मात्र अजूनही बिनचष्म्याने सुईत दोरा ओवणारी.माझ्या आईची आई.

मी लहानपणी जास्त वेळ आजोळी राहिल्याने असेल, अथवा आजीच्याच भाषेत सांगायचं तर हा "नक्षत्रांचागुण" असेल, पण माझं आणि आजीचं प्रथमपासूनच छान जमत गेलंय. आजही हातून काही चांगलं काम घडलंहा योग क्वचितच येतो!) तर आई-बाबांनंतर माझा फ़ोन जातो तो आजीलाच.
Graduation च्या वेळची गोष्ट... माझ्या अभ्यासाची लक्षणं ठीक दिसत नाहीसे पाहून आईनं आजीला पाचारण केलं आणि मी खरंच वर्षभरात केला नसेल एवढा अभ्यास आजी आल्यानंतरच्या महिन्याभरात केला.
पहाटे चार वाजता आजी आपल्या मऊसूत आवाजात हाका मारू लागायची. आधी मी "ऊठतोच" "फक्त पाचमिनीटं" वगैरे बडबडून पुन्हा झोपायला बघायचो; पण आजीच्या हाका काही थांबायच्या नाहीत आणिऊठल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. मी अभ्यासाला बसल्यावर झोपून पडू नये म्हणून आजी १५-२०माझ्यासोबत बसायची, आणि माझी झोप आता पक्की उडालीय याची खात्री पटल्यावरच झोपायला जायची.
नंतरही दिवसभर माझ्या अभ्यासावर तिचं जातीनं लक्ष असायचं. या supervision चं मला दडपण कधीच आलं नाही. उलट फायदाच झाला. एक गंमत सांगतो. माझा एक मित्र जुन्या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे घेऊन यायचा; तास -अर्धा तास त्यातील प्रश्नांशी झटापट - बहुदा निष्फळ !- केल्यावर आमची गाडी क्रिकेट, सिनेमा, कॊलेजमधील भानगडी यांसारख्या अतिमहत्वाच्या वळायची. आजीनं एक-दोनदा हे पाहिलं, पण काही बोलली नाही. दुसया वेळी तो येऊन टपकताच आजीनं त्याला "गौतम घरान ना" असं सांगून बाहेरच्या बाहेरंच पिटाळून लावलं. मी आत आहे हे त्याला माहीत होतं, बाहेर तो आला आहे हे मला कळलं होतं, पण आम्ही दोघं काय ते समजून चुकलो. परीक्षा होईपर्यंत पुन्हा काही तो मित्र परत आला नाही.
दिवसभराच्या कडक शिस्तीची भरपाई आजी रात्री करायची ती झोपण्यापुर्वी डोक्याला खोबरेल तेल थोपटून. काही क्षणांतच सारा शीण दूर जायचा. डोकं हलकं व्हायचं. मुलावरील आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी आईही अधून-मधून प्रयत्न करायची, पण आजीचा हात लागताच जी एक विलक्षण गुंगी यायची तो अनुभव आईच्या हातून कधी आला नाही.

आमच्या पिढीशी आजीचं अगदी उत्तम जमतं याचं प्रमुख कारण म्हणजे तिचा बहुश्रूतपणा. "जुनं ते सोनंआणि नवीन म्हणजे खोटं नाणं" असा तिचा कधी अट्टाहास नसतो. ती "रामायण" "महाभारत" पहाते, आणिदामिनी" " "अवंतिका" ही पहाते. बातम्या ऐकते. रोजचा पेपर वाचते. गावातल्या, गोव्यातल्या एवढंच कायपण देशातल्या आणि जगातल्या ठळक घडामोडींची तिला कल्पना असते. राजकारणात तर तिची स्वत:ची अशी ठाम मतं आहेत आणि ती ठासून मांडायला ती अजिबात कचरत नाही. तिचं "पक्षांतर" घडवून आणण्याच्या बाबतीत माझ्यासकट सर्वांनीच हात टेकलेत. आजचे दल-बदलू राजकारणी आजीचा हा एक जरी गुण ऊचलतील तर किती चांगले होईल!

जुनी माणसं सनातनी, कर्मठ असतात असा एक सर्वसाधारण अनुभव असतो. आमची आजी मात्रदेवाधर्माच्या बाबतीत अतिशय पुरोगमी आहे. प्रत्येकानं काही प्रमाणात तरी पूजा-अर्चा करावी, सोवळं-ओवळं पाळावं असा तिचा कटाक्ष नक्कीच असतो. पण कर्मकांडाचा अतिरेक ती स्वत:ही कधी करतनाही, आणि दुसयांवर तर सक्ती मुळीच नाही.
म्हातारी माणसं भोळी-भाबडी असतात हा आणखी एक समज. आजी मात्र चांगलीच धूर्त आणि व्यवहारचतुर आहे; दुसयाला अडचणीत आणता दुखवता आपली काम कशी करावी हे तिच्याकडूनच शिकावं.

सर्वांवर तिची माया आहे पण हे करताना तिनं वास्तवाचं भान कधी सुटू दिलेलं नाही. ज्या गोष्टी झाल्यापाहिजेत असं तिला वाटतं त्या केल्याशिवाय ती रहात नाही आणि ज्या गोष्टी पटत नाहीत त्या बोलूनदाखवायला ती डरत नाही. आजच्या "ओठात एक आणि मनात दुसरंच" अशा जमान्यात आजीच्या स्वभावातला हा पारदर्शीपणा अधिकच भावतो.

माझं शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरलं तेव्हा ही बातमी कानावर घालण्यासाठी शिरोड्याला गेलो. मामा-मामी, मावशी यांनी "सांभाळून रहा" "नीट अभ्यास कर" वगैरे सांगितलं. आजीचा ऊपदेश मात्र सर्वस्वीवेगळा आणि माझे पाय जमिनीवर आणणारा होता. ती म्हणाली, " आई-बाबांनी तुझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला तो ध्यानात ठेवा. नोकरी धंदा लागल्यावर आधी तो हिशोब चुकता कर आणि नंतरच काय ती मौज-मजा."

अशी आमची आजी. तिच्यासारखी आजी आम्हाला लाभली आहे हे आम्हा भावंडांचं भाग्य यात वादच नाही. पण आमच्यासारख्या एकापेक्षा एक ऊपद्व्यापी नातवांबद्दल तिचं काय मत आहे हे मात्र आम्ही तिला अजून विचारलेलं नाही.

(२५ ऒगष्ट २००४)
( "

पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे

मित्रहो,पुण्यातल्या पी. एम टी. बसेस बद्दल भरपूर बोलले, लिहिले जाते... थोडेसे चांगले, बरेचसे वाईट. तरीही लोकं पी. एम टी. ने प्रवास करणं काही सोडत नाहीत. आतापर्यंत मला वाटायचे कि ते नाईलाजापोटी असावे. परंतु काही क्षणांपुर्वीच मला पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे ऊमगले, आणि ’जे जे आपणांसी ठावे...’ या ऊक्तीनुसार मी ते आपल्याला सांगत आहे.

१. पी. एम टी. चे चालक आपली गाडी प्रकाश वेगाने हाकायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतानुसार, प्रकाश वेगाने जाणाय़ा वस्तुसाठी कालगणना थांबते. याचाच अर्थ - तुम्ही पी. एम टी. ने जितका प्रवास कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढेल.
२. पुण्यात पी. एम टी. शिवाय प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे रिक्षा अथवा स्वत:ची बाईक. समजा तुम्ही यापैकी एकाने चालला आहात आणि (देव करो, असे न होवो, पण) पी. एम टी. ने धडकले. जास्त मार कोणाला बसेल? ( या कूट-प्रश्नाचे ऊत्तर पडताळून पहाण्यासाठीच पी. एम टी. चालक वारंवार प्रयोग करत असतात).बहुसंख्य जन्तेच्या असे ध्यानात आले आहे की आपण पी. एम टी. च्या आतच जास्त सुरक्षित राहु.
३.पी. एम टी. जीवन-शिक्षण देते. काही कारण नसताना भांडण कसे ऊकरून काढावे, चालत्या गाडीत मारामारी कशी करावी, हे रोजच्या जीवनात ऊपयोगी पडणारे शिक्षण पी. एम टी. त मिळते.
४. पी. एम टी. भाषा-शिक्षण देते. कमीत कमी शब्दांत दुसयाचा अपमान कसा करावा, नव-नवीन म्हणी व वाक्प्रचार आपल्याला पी. एम टी. त शिकायला मिळतात.
५. पायाच्या एका बोटावर उभे राहू शकता? एका बोटाने वरच्या हॆन्डल-बारला लोंबकळु शकता? योगासनांचे हे नवीन प्रकार शिकण्यास पी. एम टी. नेच प्रवास केला पाहिजे.
६. गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे, " तू फ़क्त कर्म कर... फ़लाची अपेक्षा धरू नकोस.." त्याचप्रमाणे पी. एम टी. त बसणे एवढेच आपल्या हातात असते. इच्छित स्थळी सुखरूप पोहोचू की नाही, पोहोचल्यास वेळेवर पोहोचू की नाही यासारख्या क्षुद्र प्रश्नांचा भार त्या "चक्र-धरा"वर टाकून निवांत व्हावे. दुसरे म्हणजे, पी. एम टी. त बसलेला मनुष्य-प्राणी पुढील बरेच तास काहीच काम करु शकत नाही. एकुण काय तर, पी. एम टी. "निष्काम कर्मयोग आचरणात आणण्यास भाग पाडते.
७. पी. एम टी. त बसल्या-बसल्या तुम्हाला जगभरातील सर्व समस्यांची ऊत्तरे विनासायास मिळतात. अगदी... डासांपासून संरक्षण कसे करावे, इथपासून ते "नासा"त निवड व्हायला काय करावे, इथपर्यंत.
८. पी. एम टी. मधील सीट्सच्या मागे लिहिलेला मजकूर आपले सामान्य-न्यान वाढवितो. अन्यथा, रामाचे रेणुकावर कसे आणि किती प्रेम आहे, अमर नावाचा कुणीतरी "बैल" आहे, ही माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात भेटली असती?
९. पी. एम टी. त बसून खाच-खळग्यांनी भरलेल्या कर्वे रोडवरून अंगचे एकही हाड खिळखिळे न होता प्रवास करू शकणे, ही डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़. कुस्ती-स्पर्धेत भाग घेण्यासाठीची पात्रता फ़ेरी मानली जाते ( किंवा मानली जायला हरकत नाही).
१०. पी. एम टी. त अगदी घरगुती वातावरण असते. चालक-वाहक-प्यासिंजर आपुलकीने एकमेकांच्या तीर्थरूपांची चौकशी करतात. प्रेमात येऊन गालांवर चापट मारणे वगैरे प्रकार अगदी खेळीमेळीत चालू असतात.

तर, वाचकहो! अशी ही आमची पी. एम टी..... आम्ही पुणेकर त्यातून प्रवास करतो, कारण कुणीच नाही प्रवास केला तर पी. एम टी. चालणार कशी? पी. एम टी. नाही चालली तर अपघात होणार कसे? अपघातच नाही झाले तर पेपरवाले रोज उठून छापणार तरी काय? आम्ही चहा पिता-पिता वाचणार काय? आणि तावातावाने चर्चा करणार तरी कशावर??

(२ जून २००६)

Thursday, April 24, 2008

गांधीहत्या आणि मी

गांधीहत्या आणि मी
-गोपाळ वि. गोडसे

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी पकडले जाऊन त्यापैकी नथूराम गोडसेनारायण आपटे यांना फाशी देण्यात आले, तर इतर तिघांना जन्मठेप झाली. गांधी-हत्येविरूध्दचा लोकक्षोभ इतका तीव्र होता की नथूरामने आपली बाजू न्यायालयात नि:संदिग्ध शब्दांत मांडूनही त्याला माथेफिरू ठरविण्यात आले. नथूरामचे बंधू व या कटातील एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय हा आहे की गांधी-हत्त्या हे भावनेच्या भरात, परीणाम न पाहता केलेले आततायी कृत्य नसून ती थंड डोक्याने योजिलेली राजकीय हत्त्या होती.
प्रस्तुत ग्रंथात, पकडले गेल्यानंतरचे आरोपींचे वर्तन, त्यांच्यावरील अभियोग, गोडसे-आपटे यांची फाशी, उर्वरीतांची जन्मठेप व त्यांचे कौटूंबिक जीवन याचा सविस्तर आलेख मांडला आहे. अर्धा डझन छायाचित्रें पुस्तकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देतात.
गांधी-हत्त्येची ही दूसरी बाजू जिज्ञासूंनी जरूर वाचावी.
(१८ मे २०००)

गंधाली

गंधाली
-रणजित देसाई
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ऐतिहासिक काळात चपखल बसणारी शब्दरचना, केवळ शब्दांनी व्यक्तीचित्र साकार करण्याची हातोटी व भावपूर्ण प्रसंग यामूळे वाचकाला आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत असे वाटत राहते. टिपून ठेवावेत असे संवाद तर पानो-पानी आहेत.
ऐतिहासिक कथांची आवड असणाया वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानीच आहे.
(१३ ऒगष्ट २०००)

Wednesday, April 23, 2008

माझी जन्मठेप

माझी जन्मठेप
-विनायक दामोदर सावरकर
सन १९१०-१९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजे या १४ वर्षांचा इतिहास आहे. अंदमानातील कैदीजीवन, क्रूर छळ, रक्त ओकायला लावणाया शिक्षा, तुरूंगाधिकारी व इतर कैदी यांचे वर्तन, खुद्द सावरकरांचे आचार-विचार यांचे विस्तृत वर्णन यात आहे. संपूर्ण निवेदन प्रथम पुरूषात व भाषा प्रवाही, तेजस्वी असल्याने वाचक गुंगून जातो. हा ग्रंथ केवळ अंदमानातील हाल-अपेष्टांचे हृदयद्रावक वर्णन करत नाही तर ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी हे कष्ट सोसले ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रेरणा देतो.
(१५ मे २०००)

Monday, April 21, 2008

युगान्त

"युगान्त" हे पुस्तक महाभारताकडे केवळ एक पुराणकथा या दृष्टीने न पाहता तो "जय" नावाचा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, या दृष्टीकोनातून महाभारताचा वेध घेते. भीष्म, गांधारी, दूर्योधन, कर्ण, कुंत, द्रौपदी, युधिष्ठीर, आणि अर्थातच श्रीकृष्ण या प्रमुख व्यक्तिरेखांची, मानसिक जडण-घडण, अतिशय तपशिलवार रीतीने वर्णन केलेल्या आहेत. या व्यक्ति अलौकिक असल्या तरी सामान्य माणसांप्रमाणेच त्यानाही राग-लोभ-मोह-क्रोधादि विकार असल्याचे आपल्याला दिसून येते.
तर्क-कठोर विचारसरणी, सखोल वैचारिक चिंतन व संदर्भासहीत मुद्दे, ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
लेखिका एक प्रख्यात मानव-वंश शास्त्रज्ञ असल्याने महाभारतकालीन सामजिक व्यवस्था, चाली-रीती याबद्दल आपल्याला बहूमोल माहिती मिळून जाते.
पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत वंशावली हा तर एक अनमोल खजिनाच आहे!

(३० जून २०००)

स्वागत आहे!

नमस्कार!
आपले स्वागत आहे! मराठी ब्लॊग सुरू करायचे मूळ रविफने सहा महिन्यांपूर्वीच माझ्या डोक्यात पेरले होते, ते बीज आता या भर ऊन्हाळ्यात अंकुरले आहे.
"My मराठी" वर सबकुछ Marathi असेल... लेख, पुस्तक-परीक्षणें, इत्यादी, वगैरे...
सुरूवात तर केलीच आहे; पूढे कसे काय रेटता येते ते लवकरच समजेल!

आपला,
-गौतम