Monday, January 4, 2016

समज - गैरसमज: आठवड्याचे वार


आठवड्याचे वार सात (का बुवा?). प्रत्येक वाराबद्दल भारतीय समाजमनात अनेक समज / रूढी प्रचलित आहेत. सदर लेखात अश्या समजुतींचा संग्रह करण्याचा प्रयत्न आहे.


  • मंगळवारी नवीन कपडे घालू नयेत. 
  • देणी द्यायची असतील अथवा पैसे उधार । कर्जाऊ द्यायचे असतील तर ते मंगळवारी द्यावेत.
  • बुधवारी माहेराहून सासरी जाऊ नये.
  • बुधवारी नवीन कपडे घ्यावेत अथवा परीधान करावेत.
  • शुक्रवारी पैसे देऊ नयेत. वसुली करावी. पैसे कर्जाऊ घ्यायचे असले तरी अवश्य घ्यावेत.
  • शनीवारी नखं काढू नयेत. तेल, लोखंडाच्या वस्तु, चपला विकत घेऊ नये.
  • रविवारी वास्तुशांती करु नये. (रविवारी वास्तुशांतीचे मुहुर्त मी आजपर्यंत पाहिले नाहियेत).


  • ज्यांच्या घरी गाई-म्हशी असतील त्यांनी आठवड्यातील एक दिवस दूध पिऊ नये. (अर्थातच तान्ह्या मुलांचा अपवाद!)

बोर झालं नसेल तर अजून वाचा:  समज - गैरसमज: भाग पहिला


टीप: 
यातील समज / रूढींशी मी सहमत आहे असे मुळीच नसून केवळ त्यांची कुठेतरी नोंद असावी एवढाच विचार या मागे आहे. 


Thursday, December 3, 2015

गिरीश कुबेर यांस...


गिरीश कुबेर यांस:


"लोकसत्ता" मधील आपले अग्रलेख दिवसेंदिवस शिवराळ होत चालल्याचे पाहून काही महिन्यांपुर्वीच तो वाचणे बंद केले होते. पण फ़ेसबुकवर share झालेला राष्ट्रगीताच्या अवमानाचे समर्थन करणारा अग्रलेख पाहून मन पुन्हा उद्विग्न झाले.

"टाटायन" सारख्या अप्रतिम पुस्तकाचे लेखक म्हणून जो थोडा आदर वाटत होता तो तुम्ही धुळीला मिळवला आहे.

राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज, हे माझ्यासारख्या अगणित भारतीयांचे मानबिंदू आहेत आणि त्यांचा अपमान जो कोणी करेल अथवा अश्या अवमानाचे समर्थन करेल त्याला क्षमा नाही.

ईश्वर आपल्याला सद्बुद्धि देवो.

Wednesday, October 28, 2015

शब्द!


घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे ||
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला||

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये||

~ संत तुकाराम 

Sunday, February 5, 2012

किमयागार - अच्युत गोडबोले

बहुतेक वेळेस आपण जाणीवपुर्वक चांगल्या पुस्तकांचा शोध घेत असतो. परंतु, काही वेळेस मात्र एखादे पुस्तक ध्यानीमनी नसताना अवचित भेटून जाते. 
आमच्या घराशेजारच्या एका वाचनालयाचे सभासद व्हायचे अनेक दिवसांपासून ठरवत होतो. गेल्या आठवड्यात सहज गेलो असता टेबलवरच  अच्युत गोडबोले यांचे "किमयागार" पुस्तक दिसले. काही पानं चाळली अन वाचनालयाचा सभासद तर बनलोच, पण ते पुस्तक घेऊनच बाहेर पडलो!


"किमयागार" मध्ये आपल्याला भेटतात  मूलभूत शास्त्र शाखा (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र) व त्यांच्या उपशाखांमधे काम करणारे ८००हून अधिक प्रतीभावान शास्त्रज्ञ. आर्यभट्ट, अरिस्टोटल, वराहमिहीरापासून ते स्टीफन हॊकींग, जयंत नारळीकरांपर्यंत.  काही विक्षिप्त, काही हेकेखोर, काही मत्सरी, काही संधीसाधू, काही दुर्दैवी... परंतु, सर्वच जण विलक्षण प्रतीभावंत.  पण हे पुस्तक म्हणजे नुसतीच शास्त्रज्ञांची निरस जीवनचरीत्रें नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून लेखक आपल्याला या विश्वाचा इतिहास, रचना व मानवी जीवनाची सुरूवात ऊलगडत नेतात. 

पुस्तकाच्या  शेवटी असणारी संदर्भग्रंथांच्या यादीवरून नुसती नजर टाकली तरी लेखनासाठी घेतलेल्या परीश्रमांची आपल्याला जाणीव होते.

प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकावर बिल ब्रायसन याच्या A Short History of Nearly Everything या उत्कृष्ट पुस्तकाचा थोडाफार प्रभाव दिसून येतो, परंतु, दोन्ही पुस्तकांचा मूळ गाभा एकच असला तरी सादरीकरणाची पध्दत मात्र भिन्न आहे.

लेखक श्री. अच्युत गोडबोले म्हणजे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. पहिली ते IIT पर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविणारे असा त्यांचा लौकिक असून, IIT मधून रसायन शास्त्रात अभियांत्रिकी पदवी मिळविल्यावर त्यांनी संगणक क्षेत्रात ऊडी घेतली. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम करत असताना त्यांनी व्यवस्थापनशास्त्र, शास्त्रीय संगीत, अशा अनेक प्रांतात नुसती मुशाफिरीच नाही केली तर त्या- त्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर उत्तम पुस्तके लिहीली आहेत. त्यांचे "बोर्डरूम" हे पुस्तक मी पाच वर्षांपुर्वी वाचले आणि ते सुद्धा फारच आवडले होते. आता त्यांचे "नादवेध" हे पुस्तक कधी मिळते त्याची मी वाट पाहात आहे.

"किमयागार"ची काही वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण पुस्तक निव्वळ मराठी भाषेत असून प्रत्येक पानावर शास्त्रज्ञांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत.  जोडीला सुबक, नेटकी छपाई व शेकडो छायाचित्रें यामुळे पुस्तकाचे स्वरूप अधिकच सुंदर झाले आहे.  पुस्तकाच्या शेवटी असणारा "नाही रे उजाडत" हा लेख प्रत्येकालाच अंतर्मुख करेल.

आजकाल ४००/- रूपयांत एखादा pizza जेमतेम येतो. त्याच किंमतीत ज्ञान-विज्ञानाची कवाडें सताड ऊघडी करणारे आणि प्रत्येकाच्याच घरात आवर्जून असावे असे हे पुस्तक आहे. 

Tuesday, November 29, 2011

पं.संजीव अभ्यंकर - एक सुरेल संजीवन स्वरयात्रीपयले छूट सांगून टाकतो कि मला शास्त्रीय संगीतातील ओ कि ठो कळत नाही. तुम्ही समोर बसून एखादी चीज गाऊन रायलात तर तो राग आहे कि रागिणी आहे कि ख्याल आहे कि बंदीश आहे कि खरोखरच एखादी ’चीज’ आहे हे काही आपल्याला ऊमजून नाय बा येनार.


पन म्या म्हन्तो, कि आता आपल्या देशात ती शिंची लोक्शाही  की काय म्हन्तात ती हाय नव्हं, मंग एकाद्या ईषयातलं आपल्याला समजो न ऊमजो, मत ठेऊनशान देनं म्हत्वाचं, कसं?


तर, पं. संजीव अभ्यंकर या नावाची पहिली ऒळख झाली ती मुक्कम पोष्ट Edinburgh ( उच्चारी एडिनबर्घ अथवा एडिम्बर्घ अथवा एडिम्ब्रा!), मौजे Scotland येथे. दिवसभर हापिसात विंग्रजी फाडल्यावर ("अरे बाबा,  I was telling you  ना कि  it is a bug? आता बघ!") आणि घरी हिंदीच्या चिंध्या केल्यावर ("झिशानभाई, बटाटा बारीक बारीक कापना बरं का! कलके जैसा मोठे-मोठे टुकडे मत कापना, वरना वो गळे मे अडकते हय!") कानावर काहीतरी ’चांगलं’ पडावं अशी आस लागल्यास नवल नव्हतं!


महाजालावर भटकत असताना YouTube वर एक गाणे भेटले. गाण्याचे सूर, शब्द, भाव, अर्थ व या सगळ्यांइतकाच, किंबहुना त्यापेक्षाही महत्वाचा म्हणजे गायकाचा मधाळ आवाज, या सर्वांची अशी काही मोहीनी पडली कि बस्स!.


मग काय, संजीव अभ्यंकर हे नाव गूग्लायचा छंदच लागला. कधी YouTube कधी Raagaa.com अशी एक सुरेल शोधयात्रा सुरू झाली.अरे हो, सांगायचे राहिलेच -- गाणे होते मालकंस रागातले "पिया संग लड पछतानी रे"


अगदी लहान वयातच संजीवजींची शास्त्रीय गायनातील रुची पाहून आई शोभा अभ्यंकर (ज्या स्वत: मेवाती घराण्याच्या गायिका आहेत) यांनी पं. जसराज यांना संजीवला शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. एखादा कुशल जवाहीर ज्याप्रमाणे रत्नाची पारख करतो त्याप्रमाणेच पंडीतजींनी संजीवचे गायन ऐकूनच त्याला स्वीकारले. प्रत्यक्ष स्वर-भास्कर जसराज यांच्याकडून त्यांनी तब्बल १० वर्षे गुरूकुल पध्दतीने गाण्याचे शिक्षण घेतले.


संजीवजींच्या गाण्यात मला सर्वांत आवडणार्या गोष्टी दोन.

पहिली म्हणजे स्वरांतील गोडवा. सूर कितीही टिपेला लागला असला तरी तो अतिशय गोड वाटतो.

दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रीय संगीत अतिशय रूढीप्रिय मानले जात असूनही संजीवजी त्यात अनेक अभिनव प्रयोग करत असतात.  ’जसरंगी" जुगलबंदी म्हणजे दोन गायकांनी एका प्रकृतिस्वभावाचे पण दोन भिन्न राग एका वेळी गाणे ( अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यासोबत), व्हायोलिन आणि गायन यांची जुगलबंदी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायन आणि कार्नाटिक संगीत Carnatic music (शंकर महादेवनबरोबर), असे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.


पं. संजीव अभ्यंकर यांची अनेक गाणी (शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग) माझ्या संग्रही असली तरी अजून प्रत्यक्ष मैफिलीत त्यांना ऐकण्याचा योग अजून आला नाही. कधी जमते पाहू.


लेख संपविण्यापूर्वी, माझी काही आवडती गाणी:

ए री आली पिया बिन हे गाणे...
तर, अश्या या अलौकिक स्वराचा आनंद सध्या आम्ही घेत आहोत, तुम्हीही घ्यावा.


वरतारीख( अर्थात Update!):
पं. संजीव अभ्यंकर यांच्यावरचा एक अभिप्राय (कोणाचा ते विचारू नका! बंदे को जीव प्यारा हय!): "अय्या! कित्ती गोsssड smile आहे नाई! आणि dimples पण आहे वाटतं!"


कोणाला कशात काय आवडेल काही सांगता येत नाही. तुम्ही बघा, तुम्हाला काय भावतं ते!

Monday, November 21, 2011

राजा शिव-छत्रपति आणि श्रीमान योगी


शिव-चरीत्रांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपति आणि रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी यांचं स्थान अजोड आहे.
(वास्तविक, लेखाची सुरूवात "शिवाजी राजांवर अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहीली गेली असली तरी-" अशी करणार होतो, पण या दोन पुस्तकांशिवाय तिसरं नावंच आठवेना!)

"राजा शिवछत्रपति" पहिल्यांदा वाचलं तेव्हा ते एक-खंडी जाडजूड पुस्तक होतं, टाईप पण छोटा. वाचून वाचून हाताला रग लागली कि मी त्यातील सुंदर-सुंदर चित्रं रंगवायला लागायचो. (लायब्ररीचं पुस्तक असूनही, किंबहुना त्यामुळेच!)

 सर्वजण श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या जोडीला शिवाजी महाराजांचं नाव घेत असल्याने मी शिवाजीला ही निळ्या रंगात रंगवायचो. चित्र रंगवून झाल्यावर त्याखाली "Gautam Soman, Std VI Div A" अशी लफ़्फ़ेदार सही करत असे. या ऊपद्व्यापाबद्द्ल नंतर लायब्ररीयनने झापल्यावर मी तिचं "खत्रुड साहिबा" असं नामकरणही केलं होतं."श्रीमान योगी"तील पल्लेदार वाक्यांनी आणि त्यातील वातावरण-निर्मीतीने प्रचंड प्रभाव पाडला.  मी घरी दिवसभर कंबरेला टोवेल गुंडाळून त्यात कपडे वाळत घालायची काठी तलवारीच्या रूबाबात खोचून फिरत असे. जिरेटोप न सापडल्याने, "दिल है की मानता नही" मध्ये आमिर खान घालतो तशी, प्लास्टिक क्याप डोक्याला घालत असे. आईला "मासाहेब" व धाकटा भाऊ सौरभला "शंभूराजे"(!) म्हणून कावून सोडलं होतं. (बाबांना मात्र "बाबा" म्हणत होतो). 

आमच्याकडे तेव्हा कुत्रा नव्हता, म्हणून घरच्या बोक्याचे नामकरण "वाघ्या" झाले होते. रोजचे संवाद सुद्धा "मासाहेब, आम्हास अजून भात वाढा", किंवा, "शंभूराजे,  DD2 च्यानल लावा" अशा तर्हेने चालत.

फक्त एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे महाराजांसारखी भरघोस दाढी, कारण महाराजांना तशी दाढी लहानपणापासूनच होती अशी माझी पक्की समजूत होती.

हा सर्व प्रकार साधारण महिनाभर चालला, त्यानंतर आमची वार्षिक परीक्षा सुरू झाली, व महाराजांना आपले लक्ष राज्यकारभारातून काढून घेऊन algebraic equations मध्ये गुंतवावे लागले.

नंतरची जवळपास दोन दशके अशीच गेली.

दोन महिन्यांपुर्वी "राजा शिवछत्रपति" ची दोन-खंडी १७वी आवृत्ती  घरी आली.  पुस्तक वाचून तर कधीचेच झालेय, चित्रें मात्र अद्याप रंगवायची बाकी आहेत...

Friday, November 18, 2011

कामातुराणाम न भयं...

"कामातुराणाम्  न भयं न लज्जा" या अर्थाचा एक श्लोक इयत्ता आठवीत संस्कृत शिकत असताना वाचला होता. माझ्या निरागस बालमनाने तेव्हा "कामातुराणाम् " याचा अर्थ "अति काबाडकष्ट" करणारा असा लावल्याचे स्मरते.
अर्थात, लवकरच माझ्या जाणकार मित्रांनी त्याचा खरा अर्थ समजावून सांगितला.

हे सर्व आता आठवायचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ऒफ़िसमध्ये "Is Workaholism गूड कि ब्याड?" या चावून चावून चोथा झालेल्या विषयावर चर्चा झाली.

पहिली गोष्ट म्ह्णजे, अश्या चर्चा सुरूवात करणारे स्वत:  कधीच Workaholic  असत नाहीत. काम ( = Work!) करण्यापेक्षा ते टाळायचे कसे, यावरच आपली मेंदूशक्ती ( अर्थात ब्रेनपावर) खर्च करणारे हे महाभाग असतात.

दुसरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे, ती म्हणजे मी स्वत: एक workaholic आहे. २००५ ते २००८ अशी चार वर्षे, मी आणि माझे सहचारी नियमीतपणे दिवसाचे ११-१२ तास काम करत असू. अनेकदा तर आम्ही २-३ वाजता -- रात्रीचे -- घरी आलेलो आहे. रविवार कपडे वगैरे (स्वत: चे!) धुण्यात जायचा, पण शनीवारी काय करायचं ते कळायचं नाही, म्हणून ऒफ़ीस गाठायचो. एकदा तर पहाटे ४ वाजता घराच्या कुंपणावरून ऊडी मारून आत येत असता घरमालकीण आज्जींनी पाहिले, व "चोर" "चोर" म्हणून आरडा-ओरडा केला. त्यांना समजावता-समजावता नाकी नऊ आले.

तर, चर्चा चालू होती आणि प्रतिपक्ष तावातावाने बोलत होता की workaholism चा कंपनीला भरपूर फायदा होतो, पण त्या माणसाला काय फायदा?

ऊत्‍तर काय द्यायचे या विवंचनेत असता, वर निर्देश केलेला श्लोक आठवला.

मग काय, मी सर्वांना तो श्लोक आणि माझे original interpretation  सांगून चूप केले: भरपूर काम करणार्या माणसाला ना कशाची भीती असते, ना त्याला कधी कुणाकडून लज्जित व्हावे लागते. संस्कृतमध्ये तसा श्लोकच आहे राव!

हाय काय अन् ‍ नाय काय!